मुंबईकरांच्या आरोग्यासाठी ‘रस्ता खाद्य सुरक्षा’ योजना Print

‘खाऊगल्ल्यां’मधील फेरीवाल्यांना प्रशिक्षण मिळणार
प्रतिनिधी, मुंबई
संसर्गजन्य आणि जलजन्य आजारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेने ‘रस्ता खाद्य सुरक्षा’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत खाऊगल्ल्यांमधील विक्रेत्यांना खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानके, बडय़ा कंपन्या आणि संस्था, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळे आदी ठिकाणच्या खाऊगल्ल्यांमध्ये पोटाची भूक भागविण्यासाठी मुंबईकरांची गर्दी उसळते. मात्र हे पदार्थ कितपत आरोग्यदायी असतात हे सांगणे अवघड असते. हे पदार्थ खाल्ल्याने अनेकदा विषबाधा, अतिसार आदी त्रास होतो. त्यामुळे राज्य सरकार, अन्न आणि औषध प्रशासन आणि महापालिकेने मुंबईमध्ये ‘रस्ता खाद्य सुरक्षा’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंगळवारी राज्य सरकारच्या सचिवांकडे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी मुंबईतील ५५ खाऊगल्ल्यांची निवड करण्यात आली असून तेथील फेरीवाल्यांना अन्नपदार्थ कसे शिजवायचे, तयार झालेले पदार्थ कसे ठेवावेत आणि ग्राहकांना ते कसे वाढावेत याबाबतचे प्रशिक्षण या योजनेत देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिली.
हे प्रशिक्षण पुढील आठवडय़ात देण्यात येणार आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील आरोग्य विभागातील कनिष्ठ अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उपकार्यकारी वैद्यकीय अधिकारी यांचे पथक हे प्रशिक्षण देणार आहे. तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर कितीजण त्याचे पालन करीत आहेत याचे एक महिन्याने सर्वेक्षण करण्यात येईल, असे मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.