औद्योगिक वीजदेयक वेळेत न भरल्यास भरुदड Print

प्रतिनिधी, मुंबई
अवास्तव औद्योगिक वीजदराविरोधात आंदोलन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी औद्योगिक वीजग्राहकांनी वीजदेयक न भरण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, तसे केल्यास वेळेत देयक भरल्यामुळे मिळणाऱ्या सवलती मिळणार नाहीतच; शिवाय १२ टक्के व्याजाचा भरुदडही त्यांच्यावर पडणार आहे. याप्रकरणी नियमाप्रमाणे कारवाईचा आदेश ‘महावितरण’ने अधिकाऱ्यांना दिला आहे.
औद्योगिक वीजदराविरोधात आंदोलन करतानाच संघटनांनी वीजदेयके न भरण्याचे आवाहन उद्योजकांना केले होते. तसेच प्रश्न सुटेपर्यंत वीजदेयक न भरणाऱ्या ग्राहकांची वीजजोडणी तोडली जाणार नाही, असे आश्वासन ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजदेयक न भरण्याची भूमिका उद्योजकांनी घेतली आहे. तातडीने वीजदेयक भरल्यास उद्योजकांना एक टक्का सवलत मिळते. ‘लोड फॅक्टर’पोटी वीजबिलाच्या १५ टक्क्यांपर्यंत मिळणारी सवलत यापुढे मिळणार नाही. शिवाय मुदतीत वीजबिल न भरल्याबद्दल १२ टक्के व्याजही लागू होईल.