सिलिंडरसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार! Print

मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याची खेळी
खास प्रतिनिधी, मुंबई

तीन अतिरिक्त सिलिंडर सवलतीच्या दरात नेमके कोणाला द्यायचे याबाबत आठवडाभरात निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गॅसबरोबरच यंत्रमाग उद्योगाचा वाढीव वीज दर कमी करण्याचा आग्रहही पक्षाने धरला आहे. तीन अतिरिक्त सिलिंडर्स देण्याची सूचना काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राज्यांना केली असली तरी महाराष्ट्रात निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा विषय राष्ट्रवादीने खुबीने उचलला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्याचे टाळण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आठवडाभरात निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. पक्षाने आठवडय़ाची मुदत सरकारला दिली असून, तोपर्यंत निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला राज्यात जागोजागी आंदोलन करतील, असे पक्षाचे प्रवक्ते आमदार नबाब मलिक आणि महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. गेले दोन आठवडे सरकार तीन सिलिंडरचा निर्णय घेण्याचे टाळत आहे. यातून सर्वसामान्य जनतेत, विशेषत: गृहिणींमध्ये सरकारबद्दल संतापाची भावना आहे. पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका वगळता अन्य सर्वाना तीन सिलिंडरची सवलत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
घरगुती वापराच्या गॅस सििलडरबरोबरच यंत्रमाग उद्योगाचा वीज दर प्रति युनिट २ रुपये २३ पैशांवरून २  रुपये ८३ पैसे करण्याचा आदेश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिला आहे. या उद्योगावर लाखो लोकांची उपजीविका अवलंबून असल्याने राज्य शासनाने दर कमी करून दिलासा देण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली. कापूस खरेदी करण्याकरिता तात्काळ खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली.    
चैत्यभूमीसाठीही आक्रमक
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या अध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. दादर रेल्वे स्थानकाचे चैत्यभूमी असे नामकरण करण्यावर पक्षाने आक्रमक भूमिका घेण्याचा ठरविले असल्याचे गजभिये यांनी जाहीर केले. तसेच इंदू मिलच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली. भाजपचे नांदेडचे माजी खासदार डी. बी. पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२-१२-१२ राज्यभर मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे.