आयटीची यंदाची दिवाळी ‘काळी’ Print

विप्रोचा महसूल नरम; इन्फीची कर्मचारी भरतीही लांबणीवर
व्यापार प्रतिनिधी
मुंबई
अमेरिकेसारख्या साता समुद्रापार प्रचंड मागणी असणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञानावर यंदाच्या दिवाळीच्या तोंडावर काजळी निर्माण झाली आहे. विप्रोच्या रुपात ताजे वित्तीय निष्कर्ष फारशी आशा निर्माण न करू शकणाऱ्या आजच्या दिवशीच इन्फोसिसनेही कंपनीत भरती होऊ पाहणाऱ्या १७ हजार पात्र उमेदवारांना तूर्त थांबण्याचा सल्ला दिला. सहा महिन्यांपूर्वी २ ते ६ टक्क्यांची पगारवाढ जाहीर करून ती पुन्हा मागे घेणाऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फिने भावी अभियंत्यांची नियुक्ती पत्रे तूर्त रवाना न करण्याचा निर्णय घेऊन तमाम भारतीय आयटी व्यवसायावर काळी छाया असल्याचे स्पष्ट केले आहे.
सुमारे १०० अब्ज डॉलरच्या घरातील देशातील माहिती तंत्रज्ञान व्यवसाय अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून रोजगाराबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. शिवाय स्वत:च्या भरघोस महसुल वाढीबरोबरच देशाच्या विदेशी गंगाजळीतही भर घातली जाते. मात्र ऐन सण-वाराच्या तोंडावर स्थानिक आर्थिक मंदी चिंतेचे रुप धारण करित असल्याचा प्रत्यय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या सध्याच्या उपाययोजनांवरून येत आहे.
खर्चातील कपात कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिसने नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे तूर्त रवाना न करण्याचा निर्णय घेतला आहे. सेवेत घेण्यासाठी महाविद्यालयांतून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांचा आपण मान राखत असून सध्या त्यांना कंपनीत समाविष्ट करता येणार नाही, असेही इन्फोसिसने स्पष्ट केले आहे. सध्याचे व्यावसायिक वातावरण कमालीचे आव्हानात्मक असून अशा परिस्थितीत आम्ही खर्च कपातीसारखे मार्ग चोखाळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याचाच एक भाग म्हणून पात्र उमेदवारांना सध्या नियुक्ती पत्र देण्यात येणार नाहीत, असेही कंपनीने म्हटले आहे.
 इन्फोसिस कंपनीने एप्रिल २०१२ मध्ये पगारवाढ रद्द केली होती. त्याची अंमलबजावणीही गेल्या महिन्यांपासून होणार होती. त्यावेळी कंपनीने स्थानिक कर्मचाऱ्यांना २ ते ३ टक्के तर भारताबाहेरील कर्मचाऱ्यांना तब्बल ६ टक्के पगारवाढ जाहीर केली होती. कंपनीने सुरुवातीला २७ हजार कर्मचारी भरती करण्याचे ठरविले होते. मात्र आता १७ हजार उमेदवारांना देण्यात येणारे नियुक्त पत्रही तीन महिन्यांसाठी लांबणीवर टाकले आहे.
अभियंते म्हणून पात्र उमेदवार लगेचच कंपनीत नियुक्त होणार होते. मात्र आता त्यांना आणखी किमान तीन महिने थांबावे लागणार यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला भरपाई दिली जाणार आहे. कंपनीद्वारे म्हैसूर येथे होणारा सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधीही दोन महिन्यांनी कमी करून तो चार महिन्यांवर आणून ठेवला आहे. आणि तोही आता प्रत्यक्ष न होता ऑनलाईन माध्यमातून होईल. याचबरोबर कंपनीने काटकसरीचे उपाय म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रवासावर मर्यादा घातल्या आहेत. कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय बासनात बांधून ठेवला आहे.