लाचप्रकरणी आरटीओच्या निरीक्षकासह एजंटला अटक Print

प्रतिनिधी
ठाणे
मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये वाहन शिकणाऱ्या सुमारे १८ जणांचे वाहन परवाने देण्यासाठी १२ हजारांची लाच घेणाऱ्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) निरीक्षकास तसेच एका एजंटला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली.
दादासाहेब मोरे असे निरीक्षकाचे, तर संदीप देसाई असे एजंटचे नाव आहे. ठाण्यात राहणारे ज्ञानेश्वर कदम यांचे मोटार ट्रेनिंग स्कूल आहे. या स्कूलमध्ये वाहन शिकणाऱ्या सुमारे १८ जणांनी दोन महिन्यांपूर्वी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये परीक्षा दिली होती. मात्र, त्यांचे वाहन परवाने देण्यासाठी निरीक्षक मोरे यांनी कदम यांच्याकडे १२ हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी कदम यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने शुक्रवार सायंकाळी लुईसवाडी येथील प्रादेशिक परिवहनच्या कार्यालयात सापळा रचला असता, कदम यांच्याकडून मोरे यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या देसाईला रंगेहाथ पकडले, अशी माहिती सूत्रांनी दिली.