मुंब्य्रातून बाळ पळविणाऱ्या महिलेस अटक Print

प्रतिनिधी
ठाणे
मुंब्रा भागातून गुरुवारी दोन दिवसांचे बाळ पळविणाऱ्या एका महिलेला मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सात तासांत अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली. या महिलेने मूल होत नसल्याने बाळ पळविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र असे असले तरी मुंबईतील वाडिया रुग्णालयातून बाळ पळविण्याच्या घटनेमध्ये तिचा काही सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला असून यासाठी मुंबई पोलिसांचे विशेष पथक ठाण्यात दाखल झाले आहे.
प्रीती पाटील ऊर्फ प्रीती जितेश मुंडे (२४) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती दिवा भागात राहते. दिवा येथील प्रशांतनगरमध्ये राहणाऱ्या सुवर्णा पवार यांची याच भागातील एका रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान या रुग्णालयामध्ये सुवर्णाचे पती तुकाराम यांची प्रीतीशी ओळख झाली होती. या महिलेने त्यांना रुग्णालयामध्ये काम करीत असल्याचे सांगितले होते. दरम्यान गुरुवारी या महिलेने तुकाराम यांना फोन करून बाळाला डोंबिवली येथील रुग्णालयात घेऊन जायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार ते बाळाला घेऊन आले असता, रुग्णालयात जाण्यासाठी दोघांनी मुंब्रा रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. तुकाराम पुरुष डब्यामध्ये, तर प्रीती बाळाला घेऊन महिला डब्यामध्ये बसली होती. मात्र डोंबिवली स्थानकात उतरल्यानंतर प्रीती बाळाला घेऊन पळून गेल्याचे तुकाराम यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सोंडे यांच्या पथकाने अवघ्या सात तासांत तिचा शोध घेऊन तिला अटक केली. तसेच बाळाची सुखरूप सुटका करून पवार कुटुंबीयांच्या ताब्यात दिले, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. प्रीतीला मूल होत नसल्याने तिने बाळ चोरल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. तसेच या गुन्ह्य़ामध्ये आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या मागावर असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील वाडिया रुग्णालयातून बाळ चोरल्याची घटना घडली असून या घटनेशी तिचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास सुरू केला असून मुंबई पोलिसांचे पथक ठाण्यात दाखल झाले आहे, असे त्यांनी सांगितले.     

रुग्णालयांना सूचना पत्र
मुंब्य्रातील घटनेच्या पाश्र्वभूमीवर सर्व रुग्णालयांना सूचना पत्र पाठविण्यात येणार असून यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.