सलमानच्या खटला : पोलिसांच्या दिरंगाईचा पाढा Print

प्रतिनिधी
मुंबई
अभिनेता सलमान खान याच्याविरुद्धचा खटला १० वर्षे  लांबण्यामागे पोलिसांनी केलेल्या दिरंगाईचा पाढाच  माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंग यांनी कागदपत्रांसह वाचून दाखविला.
 या अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी चक्कदोन वर्षे घेतली. खटला सुरू झाल्यानंतर सहा वर्षांनी पहिला वैद्यकीय अधिकारी नार्वेकर म्हणून हजर केला गेला. त्यानंतर अविनाश ढाले या वैद्यकीय अधिकाऱ्याला सादर करण्यात आले. आपण उपचार केले नव्हते, असे या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजे ४ सप्टेंबर २०१० मध्ये संबंधित खऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सादर करण्यात आले. या खटल्याच्या सुरुवातीला ३४ साक्षीदारांवर समन्स बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले, परंतु त्यापैकी २४ साक्षीदारांवर पोलिसांनी समन्सच बजावले नाहीत. यापैकी अनेक जणांना शोध लागत नाही वा काही जण समन्स स्वीकारायला तयार नाहीत, अशी कारणे पोलिसांकडून पुढे करण्यात आली. यापैकी फक्त एकच साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात आला. पोलिसांनी जाणूनबुजून समन्स बजावण्यात हयगय केल्याचेही सिंग यांनी म्हटले आहे. कधी साक्षीदार नाहीत, तर कधी सरकारी वकील हजर नाहीत, अशा गर्तेत हा खटला अडकून पडला.
सलमान तब्बल ८२ वेळा न्यायालयात हजर राहिला नाही. खटल्याचा निकाल लागावा, या दिशेनेही पोलिसांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोपही सिंग यांनी केला आहे.