एका दिवसात दोन हजार बिल्डरांची नोंदणी! Print

विशेष प्रतिनिधी
मुंबई
राज्यात २००६ ते २०१० या कालावधीत बांधल्या गेलेल्या सदनिकांवरील ‘मूल्यवर्धित कर (व्हॅट)’ भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशी तब्बल दोन हजार बिल्डरांनी विक्रीकर खात्याकडे नोंदणी केली. एका दिवसांत नोंदणीचा हा विक्रम झाला असून बिल्डरांनी नोंदणी केली खरी, मात्र करभरणा कमी केल्याचे दिसून येत आहे. कर किती जमा झाला आहे, याचा तपशील शुक्रवारी उपलब्ध होईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत बुधवारी संपत असल्याने रात्री बारापर्यंत बिल्डरांची ऑनलाईन नोंदणी आणि कर भरण्याची प्रक्रिया सुरू होती. मुदतीनंतर कारवाई होऊ नये, यासाठी केवळ नोंदणी करून ठेवायची, असा त्यांनी काही बिल्डरांनी केला असण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडून सुमारे ५७ हजार विवरणपत्रे सादर झाली आहेत. प्रत्येक वर्षांसाठी एक असे विवरणपत्र सादर करायचे असून काही वर्षे इमारतबांधणीचे काम केले नसल्यास त्यांनी त्या वर्षांचे विवरणपत्र सादर केले नसावे किंवा सदनिकाधारकाने कर न दिल्याचे कारण सांगून त्याने करभरणा कमी केला असावा, असा अंदाज आहे. बँकांकडून विवरणपत्रे व रकमेचा तपशील शुक्रवारी आल्यावर चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.