मिठाईच्या कारखान्यांवर सरकारची नजर Print

खास प्रतिनिधी
मुंबई
दिवाळीसाठी मोठय़ा प्रमाणात मिठाई बनविताना भेसळयुक्त खवा आणि तेलाचा होणारा वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी अन्न व औषध प्रशासनास दिले. मिठाईच्या दुकानाऐवजी कारखान्यांवरच छापे टाकून माव्याची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
 दिवाळीच्या सणात मिठाईला मोठय़ा प्रमाणात होणारी मागणी लक्षात घेऊन आतापासूनच मिठाई बनविली जात आहे. ही मिठाई बनविताना त्यात भेसळयुक्त मावा, तेल यांचा होणारा वापर लक्षात घेऊन अन्न व औषध राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन  तातडीने कारावाई करण्याच्या सूचना दिल्या. मिठाईच्या दुकानांची तापसणी केल्यानंतर एखाद्या दुकानात खराब मिठाई आढळून आल्यानंतर कारवाई केली जाते.
मात्र तोवर अन्य दुकानांतही ही मिठाई गेलेली असते. त्यामुळे दुकानापेक्षा मिठाई बनविणाऱ्या कारखान्यांची अगोदरच तपासणी करून मावा, तेलाचे नमुने तपासण्याचे आदेश पाटील यांनी दिले. तसेच रेल्वे आणि जकात नाक्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून पाळत ठेवून बाहेरून भेसळयुक्त मावा येणार नाही याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी  कोणत्याही दुकानात भेसळयुक्त मावा, तेल वापरले जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.