बीएमडब्लू अपघातात जखमी झालेल्या महिलेचे निधन Print

प्रतिनिधी
मुंबई
मद्यधुंद महिलेच्या बीएमडब्लू गाडीच्या धडकेने ठोकर दिल्याने गंभीर जखमी असलेल्या महिलेचा शुक्रवारी पहाटे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे आरती शेट्टी (३२) या महिलेने भरधाव वेगाने गाडी चालवून रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात या महिलेसह चौघेजण जखमी झाले होते.
एका व्यावसायिकाची पत्नी असलेली आरती मद्याच्या नशेत असल्याने तिचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातल्या तिघांसह रिक्षाचालक जखमी झाला होता. जखमींपैकी मोबिना जहीर अली (३५) या महिलेला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या आरतीवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी गुरुवारी मद्यपान करून भरधाव वेगाने वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल केला होता, परंतु या अपघातातील महिला मरण पावल्याने आता तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.    

गाजलेले ‘हिट अ‍ॅण्ड रन’
२८ सप्टेंबर २००२ रोजी अभिनेता सलमान खान याने मद्यधुंद अवस्थेत आपल्या लँड क्रुझर या गाडीने वांद्रे येथील ‘अमेरिकन एक्स्प्रेस बेकरी’समोरील पदपथावर झोपलेल्यांना चिरडले होते. या अपघातात एकाचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानविरुद्ध दाखल असलेला ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा खटला गेल्या दहा वर्षांपासून वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या सलमानच्या अंगरक्षकाचाही खटल्यादरम्यान मृत्यू झाला. त्या पूर्वी तो अचानक बेपत्ता झाला होता.
 ९ एप्रिल २००६ रोजी अभिनेता जॉन अब्राहम याने रात्री साडेअकराच्या सुमारास कार्टर रोड येथे ‘धूम-स्टाईल’ मोटारसायकल चालवून दोघांना धडक दिली होती. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने जॉनला १६ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र अपघातानंतर जॉनने दोघा जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे वर्तन लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. परंतु भविष्यात या कृत्याची पुनरावृत्ती केल्यास जामीन रद्द करून शिक्षा भोगावी लागेल, असेही बजावले होते.
 नोव्हेंबर २००६ मध्ये अ‍ॅलिस्टर परेरा या गर्भश्रीमंत तरूणाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडले होते. या अपघातात सातजणांना जीव गमवावा लागला होता, तर बरेचजण जखमी झाले होते. त्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करीत ती तीन वर्षे केली होती. तर सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कमीच असल्याचे नमूद करीत त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी आणखीन कठोर शिक्षा द्यायला हवी होती, असे स्पष्ट केले होते.
 मद्यधुंद अवस्थेत ओमान येथील मनोरुग्णतज्ज्ञ अस्मा मादा हिने कॅडेल रोड येथे दोघांना चिरडले होते. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. अपघातानंतर अस्मा पळून गेली. मात्र नंतर तिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्धचा खटला प्रलंबित आहे.
 २० जानेवारी २००८ रोजी सिव्हिल इंजिनीअरचा मुलगा संकेत सोनावणे याने वांद्रे-कुर्ला संकुल येथे निष्काळजीपणे गाडी चालवून दोघांना चिरडले होते. त्याच्याविहरुद्धचा खटला प्रलंबित आहे. विशेष म्हणजे २००५ मध्ये त्याला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविण्याच्या आरोपाप्रकरणी एक हजार रुपयांचा दंड झाला होता.
 २८ ऑक्टोबर २०११ रोजी अभिनेता रोनीत रॉय याने आपल्या मर्सिडीजने व्ॉगनॉर गाडीला धडक दिली होती. या अपघातात चौघे जखमी झाले होते. त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली होती. रोनीत अपघातानंतर पळून गेला होता. मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली.