यशजींच्या आठवणीत रमला शाहरूख Print

प्रतिनिधी
मुंबई
‘प्रेम करा, प्रेम जिंका आणि प्रेम वाटा’, हा यशजींचा संदेश होता. आज त्यांच्या याच संदेशाचा मान राखत मी माझा ४६ वा वाढदिवस तुमच्यासोबत थाटात साजरा करतो आहे, असा खुलासा देत मोठय़ा उत्साहात शाहरूखने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत आपला वाढदिवस साजरा केला. ज्या यश चोप्रांचा शाहरूखच्या चित्रपट कारकीर्दीत मोलाचा वाटा होता त्यांच्या निधनानंतरचा आज तेरावा दिवस. पण, आज या क्षणी त्यांच्या जाण्याचे दु:ख करत बसण्यापेक्षा त्यांच्या आठवणींना उजाळा देत शाहरूखने आपला ४६ वा वाढदिवस साजरा करणे पसंत केले.
‘डर’ चित्रपटात मी साकारलेली भूमिका माझ्याआधी एका अभिनेत्याने नाकारली होती. ही भूमिका मला देताना यश चोप्रांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला. खंडाळ्यात आम्ही या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात केली तेव्हा माझे त्यांच्याशी अगदी घरच्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतील, असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. पण, त्यानंतर जे घडत गेले तो इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, या शब्दांत शाहरूखने त्याची आणि यश चोप्रांची नाळ कशी जुळली याची आठवण सांगितली. ‘जब तक है जान’ हा यशजींचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याचे दुख असले तरी ते बाजूला सारून हा चित्रपट सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे ही आपल्यावरची मोठी जबाबदारी असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
खरंतर, वाढदिवस असल्याने आज उशिरापर्यंत आपण झोपून होतो. मात्र, चाहत्यांच्या अमाप प्रेमामुळेच आपल्याला जाग आल्याचेही त्याने कबूल केले. शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी देशभरातून आलेल्या चाहत्यांनी कालपासून त्याच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर ठाण मांडले होते. यात छत्तीसगडहून पहिल्यांदा मुंबईत खास रांगोळीतून शाहरूखची प्रतिमा उतरवण्यासाठी आलेला चंद्रकांत साहू हा तरूणही होता. तर शाहरूखसाठी ‘मन्नत’बाहेर बॅंडबाजा वाजवणारे चाहतेही त्या गर्दीत होते. या चाहत्यांना शाहरूखने बंगल्याबाहेरच्या गॅलरीत येऊन अभिवादन केले. माझा वाढदिवस माझ्या कुटुंबियांबरोबरच कित्येकांसाठी विशेष आहे, ही भावनाच मला जास्त स्पर्शून गेली, असे शाहरूखने यावेळी बोलताना सांगितले. तर फराह खान, अभिषेक-ऐश्वर्या बच्चन अशा त्याच्या सिनेसृष्टीतील मित्रपरिवारानेही काल मध्यरात्रीच त्याला भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे पसंत केले. दिल्लीतला एक साधारण मुलगा ते बॉलिवुडचा ‘किंग खान’ असा लौकिक मिळवणाऱ्या शाहरूखने हा प्रवास अतिशय अवघड होता हे सांगतानाच आपण समाज बदलू शकतो. समाजातील काही गोष्टी बदलायलाच हव्यात असे ऐनतारूण्यात आपल्या सगळ्यांनाच वाटत असते तसे ते मलाही वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात आपल्याला सहजपणे या गोष्टी बदलता येत नाहीत. तर सामाजिक चौकटीत राहूनच आपल्याला काम करावे लागते, हे भान इतक्या वर्षांनी आपल्याला आले असल्याचे शाहरूखने सांगितले. आपल्या दिलखुलास स्वभावाने आणि हजरजबाबी उत्तरांनी लोकांचे मनोरंजन करणाऱ्या शाहरूखच्या स्वभावातून वाढत्या वयाबरोबर डोकावणारा हा परिपक्वपणा उपस्थितांना आश्चर्यचकित करून गेला.