नव्या उपनगरी गाडय़ांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार Print

प्रतिनिधी
मुंबई
नव्या उपनगरी गाडय़ांमध्ये मोबाईल सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोधकुमार जैन यांनी दिली.
 ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या आयडिया एक्स्चेंजमध्ये संवाद साधताना महाव्यवस्थापक जैन यांनी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेचा सर्वांगीण आढावा घेतला. रेल्वे स्थानकांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक चोऱ्या अथवा लुटमारीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. अलीकडेच दादर रेल्वे स्थानकावर टीसीकडून प्रवाशाला झालेल्या मारहाणीच्या घटनेचे चित्रिकरण पाहिले असता त्यात विनातिकीट प्रवासी पळताना त्याचा चष्मा फुटल्याचे या कॅमेऱ्यात दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच आता नव्या उपनगरी गाडय़ांमध्येही असे कॅमेरे लावण्याची योजना असेल. सर्व लहान-मोठय़ा स्थानकांवर रेल्वे पोलिसांची सुरक्षा असून महिलांच्या डब्याजवळ तीन पोलीस सतत लक्ष ठेवून असतात. नागपूर येथे प्रवाशांच्या बॅगांचे स्कॅनिंग करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
दिल्लीप्रमाणे मुंबईत रेल्वे मार्गाशेजारील जागा सरकारी नाही तर अनेक खासगी मालमत्ता असल्याने रेल्वेला विकासासाठी जागा उपलब्ध नाही, असे सांगून ते म्हणाले की, मुंबई रेल विकास प्राधिकरणाने जागा संपादित केली तरी तेथील लोकांचे पुनर्वसन केल्यानंतरच रेल्वेला प्रकल्प राबविता येतील. रेल्वेवरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आता केवळ एलिव्हेटेड ट्रेनचाच पर्याय शिल्लक आहे. स्थानकांवर स्वच्छतागृहे उभारण्यास प्राधान्य देण्यात आले असून पादचारी पुलाखालील जागेमध्ये ही स्वच्छतागृहे उभारण्यात येतील, असेही ते म्हणाले.
उपनगरी रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल तसेच भुयारी मार्ग यांनाही प्राधान्य देण्यात आले असून मार्च २०१३ पर्यंत सर्व स्थानकांवर १२ डब्यांच्या गाडीच्या प्रवाशांसाठी फलाटांवर छप्पर बांधण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.