परळमध्ये तरुणीवर हल्ला Print

प्रतिनिधी
मुंबई
परळ येथे शुक्रवारी सकाळी एका तरुणीवर ब्लेडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ही मुलगी जखमी झाली असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करून पळणाऱ्या प्रशांत हुले या तरुणाला जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दिवा येथे राहणारी मोना चौधरी (२०) ही तरुणी परळच्या शिरोडकर महाविद्यालयात अकरावीत शिकते. ती नेहमीप्रमाणे बेकरी उत्पादनाच्या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. सकाळी ११ च्या सुमारास तिच्या वाटेवर दबा धरून बसलेल्या प्रशांत हुले (२२) या तरुणाने तिला अडवून तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले. हल्ला करून पळून जाणाऱ्या प्रशांतला जमावाने पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. मित्र सनी ऊर्फ सुनील िलगरे याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याचे प्रशांतने सांगितल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दिली.
सनी आणि मोना यांच्यात गुरुवारी दुपारी रस्त्यात धक्का लागल्याने शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे चिडलेल्या सनीने बदला घेण्यासाठी प्रशांतला सांगून हा हल्ला घडवून आणला असल्याचे पाटील म्हणाले. सनी आणि प्रशांत हे दोघेही धारावीला राहणारे असून दोघांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे. पोलीस फरारी सनीचा शोध घेत आहेत.