उपनगरात घर हवे? ८० ते ९० लाख मोजा! Print

प्रतिनिधी
मुंबई
मुंबईच्या उपनगरात वन बीएचके घरासाठी ८० ते ९० लाख, तर टू बीएचके घरासाठी एक ते पाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतील दर चढे असतानाही मीरा रोड, वसई, विरार ते कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आदी परिसरातील घरांसाठी मध्यमवर्गीयांनी फारशी मागणी नोंदविल्याचे आढळून येत नाही.
दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदीत वाढ होईल, असे विकासकांना वाटत असून या सर्वानी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात याच आशेने आपले प्रकल्प प्रदर्शनात मांडले आहेत. तब्बल १५ हजार घरांचे पर्याय या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, मीरा रोड, वसई, डोंबिवली-कल्याण, अंबरनाथ, कर्जत, रायगड, पनवेल आदी ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबईत वन बीएचके घर कमीत कमी ८० लाखांना उपलब्ध आहे. तर टू बीएचके घराची किंमत एक कोटीच्या आसपास आहे. भूखंडाचे वाढते दर, महागडा मजूर, वाढते व्याजदर आणि मंजुरी मिळण्यास लागणारा विलंब आदी कारणे घरांच्या किमती वाढण्यास कारणीभूत आहेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष व विकासक पारस गुंदेचा यांनी सांगितले.
या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या ओमकार रिअ‍ॅलिटी अँड डेव्हलपर्सच्या मालाड पूर्व येथील १५ एकर भूखंडावर पसरलेल्या नियोजित गृहप्रकल्पातील श्वान उद्यान ग्राहकांसाठी खास आकर्षण ठरले. श्वानप्रेमींसाठी ही सुविधा महत्त्वाची असून अमेरिकेतील बार्कले पेट होटेल्स अँड स्पा यांनी आराखडा तयार केल्याचे ओमकार रिअ‍ॅलिटीचे मुख्य विपणन अधिकारी भरत धुप्पर यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनात घरांव्यतिरिक्त स्टुडिओ अपार्टमेंट, डय़ुप्लेक्स फ्लॅट, पेण्टहाऊस, रो हाऊस, बंगले तसेच सेकंड हॉलिडे होमचाही समावेश असल्याचे आढळून आले.