विधिमंडळात घोटाळे गाजविण्याची शिवसेनेची रणनीती! Print

विशेष प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारने राज्याची पुरती वाट लावली आहे. सिंचन घोटाळ्यासह असंख्य घोटाळे रोजच्या रोज उघडकीस येत आहेत. काँग्रेसचे मंत्री की राष्ट्रवादीचे मंत्री अधिक घोटाळ्यात गुंतले आहेत, याचीच चर्चा सध्या या पक्षाचे नेते करत असून विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात सरकारवर चौफेर हल्ला चढवा, असा आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाच्या आमदारांना दिला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने किमान शंभर जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, त्याची रणनीतीही उद्धव यांनी जाहीर केली.
दादर येथील शिवसेना भवनात शुक्रवारी शिवसेनेचे आमदार व खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी आयोजित केली होती. विधानसभा निवडणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात संघटनात्मक फेरबदल करण्याचे उद्धव यांनी या बैठकीत सूचित केले. किमान शंभर जागाजिंकण्याचे लक्ष्य शिवसेनेने निश्चित केले असून त्यासाठी काही जिल्हाध्यक्षांना बदलण्यात येणार आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय संपर्कप्रमुखांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याचेही उद्धव यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याच्या पाश्र्वभूमीवर उद्धव यांनी आयोजित केलेल्या बैठकीबाबत कुतूहल निर्माण झाले होते. मात्र विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तयारीसाठी ही बैठक घेतल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. गेली काही वर्षे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपण आमदारांची बैठक घेऊन मार्गदर्शन करत होते. मात्र हा वेळ कमी पडत असल्याचे लक्षात आल्यामुळे यंदा लवकर बैठक आयोजित केली. या बैठकीत सिंचन, वीज, तसेच राज्यातील विविध प्रश्नांची माहिती घेऊन आक्रमकपणे विधानसभेत सरकारवर तुटून पडण्याचे आदेश उद्धव यांनी आमदारांना दिले. त्याचप्रमाणे यापुढे आंदोलन करण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, तर स्थानिक प्रश्नांवर राज्यभर आंदोलने करा असेही उद्धव यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या प्रकृतीचा आणि आजच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. ही बैठक १५ दिवसांपूर्वीच निश्चित करण्यात आली होती. तसेच अधिवेशनापूर्वी आणखी एकदा आमदारांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.     
अजितदादा मोकळे कसे फिरतात?
उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. सिंचन घोटाळ्यावरून विधिमंडळात सरकारची कोंडी करा, असे आदेश देतानाच, या घोटाळ्यावरून राज्यभर गदारोळ सुरू असतानाही अजितदादा मोकळे कसे फिरू शकतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.