सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचे पद्धतशीर प्रयत्न Print

अजित पवारांचा राजीनामा पथ्यावर
संतोष प्रधान, मुंबई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

औरंगाबादमध्ये युवती काँग्रेसच्या मेळाव्याच्या माध्यमातून झालेले शक्तिप्रदर्शन, युवतींपाठोपाठ महिला व युवक काँग्रेसच्या कारभारात लक्ष घालण्याचे केलेले सुतोवाच, घरगुती वापराचे तीन गॅस सिलिंडर सर्वांना सवलतीच्या दरात मिळावेत म्हणून घेतलेला पुढाकार यातून खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचे पद्धतशीर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.


घरगुती वापराच्या गॅस सििलडरच्या संख्येवर मर्यादा घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेस सरकारच्या निर्णयावर सर्वसामान्यांमध्ये नाराजी असल्याने त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केला आहे. पक्षाध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी गॅस सिलिंडरच्या निर्णयाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध केला. काँग्रेस पक्षाने अनुदानाच्या रक्कमेत तीन सिलिंडर सवलतीच्या दरात देण्याचा आदेश आपली सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला असला तरी महाराष्ट्रात आर्थिक बोजा लक्षात घेता नक्की कोणाला ही सवलत द्यायची यावरून सरकारमध्ये मतभेद आहेत. वित्त खाते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठय़ा प्रमाणावर सवलत देण्यास विरोध असल्याचे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. आता मात्र गॅस सिलिंडरच्या वादात खासदार सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीने पुढे केले आहे. दिवाळीच्या आधी तीन सिलिंडरचा निर्णय झालाच पाहिजे, अशी मागणी खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली. तीन सिलिंडरच्या निर्णयाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळाला पाहिजे, अशीही भूमिका खासदार सुळे यांनी घेतली आहे. एकूणच सर्वसामान्य किंवा गृहिणींशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीने खासदार सुळे यांना पुढे करून त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. पुढील आठवडय़ात गॅस सिलिंडरचा निर्णय झाल्यास त्याचे सारे श्रेय सुप्रिया सुळे यांना देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. यामुळेच बहुधा काँग्रेसने आंदोलन करण्याच्या राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे सारे प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आहे. गेल्याच आठवडय़ात औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या युवती काँग्रेसचा राज्यपातळीवरील मेळावा आयोजित करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पक्षाचे झाडून सारे नेते या मेळाव्याला उपस्थित राहिले होते. युवतींचा मेळावा यशस्वी करण्याकरिता नेतृत्त्वाकडून संबंधितांना तशा ‘सक्त’ सूचना देण्यात आल्या होत्या. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला. युवतींचा मेळावा यशस्वी झाल्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कारभारात सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातले आहे. दोनच दिवसांपूर्वी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुप्रिया सुळे यांनी बोलाविली होती. अजित पवार हे त्या बैठकीला उपस्थित राहतील याची खबरदारी घेण्यात आली होती. युवती काँग्रेसच्या धर्तीवर महिला काँग्रेसचे राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करून पुण्यातील उमेश पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवक काँग्रेसला आक्रमक करण्यासाठी सुप्रियाताई लक्ष घालणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्याच्या राजकारणात येण्याची इच्छा नसल्याचे सुप्रिया सुळे हे सातत्याने सांगत आल्या असल्या तरी त्यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत असल्याचे एकूणच नेतृत्वाच्या कृतीवरून स्पष्ट होते.