रवींद्र नाटय़मंदिरात आजपासून ‘युवा रंगोत्सव’ Print

प्रतिभावान तरुण कलाकारांचा अविष्कार
प्रतिनिधी
मुंबई
राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे येत्या ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात महाराष्ट्र युवा रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे वैशिष्ठय़ म्हणजे तरुण कलाकारांकडून नाटक, शास्त्रीय संगीत, दृककला, चित्रपट, लोककला आदींचे कलाविष्कार सादर होणार आहेत. महोत्सवात या विषयांवर विविध कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्ताने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
४ नोव्हेंबर रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून उद्घाटनानंतर वामन केंद्रे दिग्दर्शित ‘मोहे पिया’ या नाटकाचे सादरीकरण व त्यानंतर डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित ‘गोळाबेरीज’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी सुद्धशील चॅटर्जी यांचे संतूर वादन, अनुराधा पाल यांचे तबला वादन, श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांनी भगवान विष्णु, श्रीकृष्ण आणि विठ्ठल यांच्यावरील अभंगांवर ‘विठ्ठला तुझे चरणी’ हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नालंदा नृत्य संशोधन केंद्राचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी लोककला या कलाविष्कारावर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे.
तसेच ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत दुपारी २ ते ५ या वेळेत विविध कलाविष्कारांवर आधारित कार्यशाळा तर ४ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते १० या वेळेत रवींद्र नाटय़ मंदिर येथे विविध कलाविष्कारांवर आधारित रंगमंचीय सादरीकरण होणार आहे.
या विविध कार्यशाळेत पं. अजय पोहनकर, प्रा. वामन केंदे, डॉ. प्रकाश खांडगे, विजय खातु, पुरुषोत्तम बेर्डे, डॉ. कनक रेळे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.