एटीएम केंद्र तोडफोडप्रकरणी तिघांना अखेर अटक Print

प्रतिनिधी
मुंबई
माहीमच्या मोरी रोड येथील आंध्र बँकेच्या एटीएम सेंटरची तोडफोड केल्याप्रकरणी माहीम पोलिसांनी अश्रफ सय्यद, जाफर अन्सारी, आसीफ शेख या तिघांना अटक केली आहे.
मोरी रोड येथील जनता सेवक सोसायटीत अश्रफ, जाफर, आसीफ हे तिघेही राहतात. ते तिघेही बेरोजगार आहेत. मौजमजा आणि नशापाणी करण्यासाठी आंध्र बँकेचे एटीएम लुटण्याचा डाव त्यांनी रचला. त्यासाठी काही दिवस त्यांनी पहाटेच्या वेळी जाऊन पाहणी केली. सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ते एटीएम सेंटरमध्ये आले व त्यांनी शटर ओढून घेतले. आतील सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून त्याचे हातपाय बांधले.
शस्त्रांच्या साह्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण तो अपयशी ठरल्याने ते पळून गेले. सुरक्षारक्षकाला मारहाण करताना अश्रफच्या तोंडावरील कापड निघाले व त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
अश्रफचा चेहरा, सुरक्षारक्षकाला बांधलेल्या दोरीवरील गुलाबी रंगाचा डाग यावरून पोलिसांनी तिघांचा शोध घेत त्यांना अटक केली. घटनेवेळी अश्रफचे केस लांब होते, पण प्रसिद्धी माध्यमांना ही चित्रफीत पोलिसांनी दिली व ते अश्रफने टीव्हीवर पाहिले. त्यानंतर त्याने केस बारीक करून घेतले, असे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.