चारित्र्याच्या संशयावरून मुलुंडमध्ये पत्नीची हत्या Print

प्रतिनिधी
मुंबई
पत्नीच्या चारित्र्याबाबत संशयावरून झालेल्या भांडणातून तिचा गळा दाबून खून केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. खुनानंतर पती ज्ञानेश्वर सरोदे याने आपणहून पोलिसांत जाऊन अटक करवून घेतली, तर मालाड येथील दुसऱ्या एका घटनेत हुंडय़ासाठी पत्नीला जाळून मारण्यात आले.
मुलुंडमध्ये राहणाऱ्या ज्ञानेश्वरचे काही महिन्यांपूर्वी रिचाशी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांत कुरबुरी सुरू झाल्या. त्यातून ज्ञानेश्वर रिचाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर आणि रिचा यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात ज्ञानेश्वरने रिचाचा गळा दाबून खून केला. यानंतर ज्ञानेश्वर मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याने आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरला अटक केली.
पत्नीला जाळून मारले
मालाडमधील कुरार येथे अल्ताफ याने आपल्या घरातील सदस्यांच्या मदतीने पत्नी हीना हिला हुंडय़ासाठी जाळून ठार मारले.
हीना मूळची जालन्याची होती. अल्ताफबरोबर तिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. माहेरहून काही लाख रुपये हीनाने आणावेत यासाठी अल्ताफ सतत तगादा लावायचा. परंतु हीनाच्या माहेरची परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे हुंडय़ासाठी सतत तिला मारहाण व्हायची.
त्यातूनच अल्ताफ व त्याच्या घरातल्यांनी हीनाच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. हीनाला उपचारासाठी भगवती रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्ताफ व त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.