दीड वर्षांच्या मुलाच्या खुनाच्या आरोपातून आईची सुटका Print

प्रतिनिधी
मुंबई
दीड वर्षांच्या पोटच्या मुलाच्या खुनाच्या आरोपातून मुंबई उच्च न्यायालयाने ३३ वर्षांच्या महिलेची शुक्रवारी निर्दोष सुटका केली. तिनेच तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा खून केल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे स्पष्ट करीत कनिष्ठ न्यायालयाने तिला निर्दोष ठरविले होते. शुक्रवारी उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत तिच्या पतीनेच केलेले अपील फेटाळून लावले.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत शीतल घोडके हिला मुलाच्या खुनाच्या आरोपातून दोषमुक्त केले. ठोस आणि विश्वासार्ह पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. त्यामुळे शीतलनेच तिच्या मुलाचा खून केला हे मान्य करणे योग्य होणार नाही. त्यामुळेच कनिष्ठ न्यायालयाने अशा परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत राहून जो निर्णय घ्यायला हवा, तो घेतलेला आहे आणि त्यावर हे न्यायालयही शिक्कामोर्तब करीत असल्याचे न्यायालयाने निकाल देताना विशेषकरून नमूद केले.
पोलिसांच्या दाव्यानुसार, सज्जन आणि शीतल यांचा मे १९९९ मध्ये विवाह झाला होता आणि ते पुण्यात राहत होते. त्यांना एक मुलगी आणि मुलगा अशी दोन मुले झाली. मुलगा झाल्यानंतर शीतलचा स्वभाव मोठय़ा प्रमाणात बदलला. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून ती चीडचीड करू लागली. परिणामी तिचे आणि तिच्या पतीचे वरचेवर खटके उडू लागले. रोजच्या भांडणाला कंटाळून शीतल घर सोडून निघून गेली. ती व्यवसायाने डॉक्टर असलेली मावशी दीपाली पाटील हिच्याकडे गेली होती. शीतलची मानसिक स्थिती लक्षात घेऊन तिला मानसोपचाराची गरज असल्याचे दीपालीने सज्जनला सांगितले. त्यानंतर तिच्यावर कोल्हापूर येथील डॉ. नगरकर रुग्णालयात दोन महिने उपचार सुरू होते. १९ जून २००६ रोजी सज्जनने शीतलला दीड वर्षांच्या मुलासह मालेगाव येथील आपल्या गावी पाठवले. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याला नातेवाईकांनी दूरध्वनी करून त्याच्या मुलाचा मृतदेह सापडल्याचे वृत्त कळविले. तसेच त्याच्या आईने शीतलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्याचेही सांगितले. शीतलची अटकेनंतर लगेचाच जामिनावर सुटका झाली.