कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींना २५ नोव्हेंबरनंतर नवे भाडे देऊ नका Print

परिवहन आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी
मुंबई
मीटर कॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींना २५ नोव्हेंबरनंतर नवे भाडे देऊ नये असे आवाहन परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी केले आहे. २४ नोव्हेंबपर्यंत मीटर कॅलिब्रेशनची अंतिम मुदत आहे.
डॉ. हकीम यांच्या अहवालानुसार ११ ऑक्टोबर रोजी भाडेवाढ झाल्यावर २४ नोव्हेंबपर्यंत मीटर कॅलिब्रेशनसाठी मुदत देण्यात आली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांनी या कालावधीत आपल्या वाहनांचे मीटर कॅलिब्रेट करून घ्यावेत, असे वारंवार सांगूनही अद्याप अनेक रिक्षा-टॅक्सींचे मीटर कॅलिब्रेट झालेले नाहीत. अनेक रिक्षा-टॅक्सी चालकांनी कॅलिब्रेशन करून घेण्यास नकार दिला असून अशा वाहनांवर २५ नोव्हेंबरपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांनी मीटर २४ नोव्हेंबपर्यंत कॅलिब्रेट करून घेतली नाहीत तर नागरिकांनीही या वाहनांना नवे भाडे देऊ नये, असे आवाहन परिवहन आयुक्तांनी केले आहे. नोव्हेंबर महिन्यातील पहिले तीनही रविवार तसेच दिवाळीचा एक दिवस वगळता परिवहन कार्यालये यासाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
११ ऑक्टोबरनंतर रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परिवहन कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. मात्र त्यावेळी रिक्षा-टॅक्सीच्या मीटर कॅलिब्रेशनसाठी फार कमी रिक्षा-टॅक्सी चालक आले. सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवूनही विशेष वेग वाढत नसल्याचे आढळले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, ११ ऑक्टोबरपासून ३ नोव्हेंबपर्यंत ८७६७ टॅक्सी तर १७,१६८ रिक्षांचे मीटर कॅलिब्रेट झाले आहे. ताडदेव येथे शनिवारी ४४८ टॅक्सींचे तर आतापर्यंत ६३५२ टॅक्सींचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले तर वडाळा (पूर्व उपनगर) येथे शनिवारी ४८० रिक्षा तर १५५ टॅक्सींचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले. आतापर्यंत ८७३२ रिक्षा तर १५०५ टॅक्सींचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे.
अंधेरी (पश्चिम उपनगर) येथे प्रादेशिक परिवहन विभागात शनिवारी ५२४ रिक्षा तर ९५ टॅक्सींचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले असून आतापर्यंत ८,४३६ रिक्षा तर ९१० टॅक्सींचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले.     

कॅलिब्रेटेड मीटर कसे ओळखाल?
रिक्षा-टॅक्सी चालकाने प्रवासी बसल्यावर मीटर सुरू केले की त्यावर रिक्षात १५ तर टॅक्सीत १९ रुपये मीटरवर दिसले पाहिजेत. मीटर इलेक्ट्रॉनिक असो वा मेकॅनिकल दोन्हीमध्ये भाडे एकच दिसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही, असे परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले.