मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश याद्या जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल Print

विशेष प्रतिनिधी
मुंबई
शैक्षणिक वर्षांचे पहिले सत्र संपत आले तरी मुंबईतील मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला नसल्याने दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना निवाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे.
मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चेंबूर, जोगेश्वरी, वरळी, गोरेगाव व कांदिवली येथे वसतिगृहे आहेत. दरवर्षी जून महिन्यात नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यावर्षी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वेळेत अर्ज करूनही ऑक्टोबर उजाडला तरी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाचही वसतिगृहातील दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना खासगी ठिकाणी आपली सोय करावी लागत आहे. यात राज्यभरातून आलेल्या विद्यार्थिनींचे खूपच हाल होत आहेत.
सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यावर त्यांना दुरूत्तरे केली जात असल्याचा आरोप मुंबई युवा जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे अध्यक्ष संजय बनसोडे यांनी केला आहे. अर्ज आल्यावर १५ दिवसांत पात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर करणे आवश्यक असताना पाच महिने याद्या जाहीर न केल्याने आंदोलन करण्याचा इशारा जनता दलाने दिला आहे.