चारा छावण्यांच्या आडून सरकारी निधीची लूट Print

सहा हजार गावांसाठी ४०० छावण्या; मोठय़ा प्रमाणावर खर्च
खास प्रतिनिधी
मुंबई
सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे राज्यातील पिकांची स्थिती सुधारली असल्याने दुष्काळी गावांची संख्याही गेल्या वर्षीच्या तुलनेत घटली आहे. मात्र सरकारी निधीवर डोळा ठेवून राजकारण्यांकडून अजूनही दुष्काळाचा बोलबाला केला जात आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा बसण्यापूर्वीच सरकारच्या तिजोरीतून ५०० कोटीं खर्च झाले असून त्यातील तब्बल ३५० कोटी रूपये चारा छावण्यांवरच खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे २०१० मध्ये राज्यात तब्बल २० हजार गावांमध्ये दुष्काळ असतानाही केवळ १०-१५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी सरकारच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा उठवीत राजकीय मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावोगावी चारा छावण्यांची दुकाने उघडली जात असून आतापर्यंत ४०० ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत आणि त्यावर मोठय़ा प्रमाणावर खर्च केला जात आहे.
 राज्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाची झळ बसत असून २०१० मध्ये २० हजार २४० तर गेल्या  वर्षी ७ हजार ६५३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. तर यंदा आतापर्यंत ६ हजार २५० गावांमध्ये पिकांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.  
ऑगस्टच्या मध्यापर्यंत राज्यातील अनेक भागांत पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने अनेक तालुक्यातील दुष्काळसदृष्य परिस्थिती लक्षात घेत जनावरांच्या छावण्या, चारा डेपो सुरू करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात मात्र नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून छावण्यांऐवजी चारा डेपोच उघडले. त्यामुळे पहिल्या दोन महिन्यातच तब्बल ३४४ चारा डेपो सुरू झाले आणि त्यावर सुमारे २५० हून अधिक कोटी रूपये खर्च झाले.
चारा डेपोमधील घोटाळ्यांच्या तक्रारी येताच १५ ऑगस्टपासून चारा डेपोची दुकाने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्यानंतरही आपल्या भागात मोठय़ाप्रमाणात दुष्काळ असल्याचा कांगावा करीत चारा डेपो किंवा छावण्या सुरू करण्याचा आग्रह लोकप्रतिनिधीकडून धरला जात आहे.
मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या दानशूरपणाचा पुरेपुर फायदा राजकीय मंडळींकडून उठविला जात असून आतापर्यंत तब्बल ३९९ ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत. त्यावर गेल्या महिनाभरात सुमारे ६०-६५ कोटी रूपयांचा खर्च झाला असून दुष्काळावर आतापर्यंत ५०० कोटीं रूपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.