अबू जुंदालवर साडेतीन हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र Print

औरंगाबाद स्फोटके-शस्त्रसाठा खटला
प्रतिनिधी
मुंबई
मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला दहशतवादी झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्यावर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २००६ सालच्या औरंगाबाद येथील स्फोटके-शस्त्रसाठा प्रकरणी शनिवारी तीन हजार ६५० पानांचे आरोपपत्र दाखल केले.
गेल्या १७ ऑगस्ट रोजी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने या प्रकरणी २१ जणांवर आरोप निश्चित केले होते. त्यापूर्वी काही दिवस आधीच जुंदालला अटक करण्यात आली होती. त्यामुळे जुंदालवर शनिवारी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
जुंदालवरील आरोपपपत्रात त्याला मुख्य आरोपी दाखविण्यात आले आल्याची माहिती एटीएसतर्फे देण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार, ८ मे २००६ रोजी टाटा सुमो आणि इंडिया अशा दोन गाडय़ांमधून मोठय़ा प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रांची तस्करी करण्यात येत होती. एटीएसच्या पथकाने त्याबाबतची खात्रीलायक माहिती मिळताच औरंगाबाद येथील चांदवड-मनमाड महामार्गावर या दोन गाडय़ांची अडवणूक करून तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती.
याशिवाय सुमारे ३० किलो आरडीएक्सच्या साठय़ासह १० एके-४७ रायफल आणि तीन हजार २०० जिवंत काडतुसे असा स्फोटके आणि शस्त्रांचा साठा हस्तगत केला होता.
जुंदाल मात्र त्या वेळेस पोलिसांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासून तो फरारी होता. दोनपैकी एक गाडी जुंदाल चालवत होता, असा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतर जुंदाल मालेगाव येथे पळून गेला होता. तेथे त्याने गाडी ओळखीच्या व्यक्तीच्या हवाली केली. त्यानंतर तो बांगलादेशला पळून गेला. तेथून नंतर तो बनावट पारपत्राच्या आधारे पाकिस्तानला गेला.