अनियमित पाणी पुरवठय़ाच्या निषेधार्थ बदलापूरकरांचा मोर्चा Print

खास प्रतिनिधी
ठाणे
बदलापूरमधील अनेक भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजपच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
बदलापूर पूर्व विभागातील भवानीनगर, दत्तवाडी, शिवाजीनगर, संजयनगर आदी भागात गेल्या अनेक महिन्यांपासून अपुऱ्या आणि सदोष वितरण व्यवस्थेमुळे पाणीटंचाई भेडसावत आहे. काही सोसायटय़ांना पाण्याच्या टँकरसाठी हजार रूपयेही मोजावे लागत आहेत.
या सर्व गैरसोयींचा पाढा वाचण्यासाठी भाजपच्या नगरसेविका मुग्धा नार्वेकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजेंद्र घोरपडे, सुनील मेने आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.