अंबरनाथसाठी सेनेचे ‘राज’गडाला पुन्हा साकडे? Print

मनसेच्या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता
खास प्रतिनिधी
ठाणे
अडीच वर्षांपूर्वी मनसेने बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे अंबरनाथ पालिकेची सत्ता हस्तगत करू शकणारी सेना आता या पक्षाने काँग्रेस आघाडीची कास धरल्याने अल्पमतात आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या नगराध्यक्षपद निवडणुकीत मनसेने सेनेच्या पारडय़ात मते टाकावीत म्हणून जिल्ह्य़ातील सेनेच्या काही नेत्यांनी पुन्हा एकदा ‘राज'गडाला साकडे घातल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बदलापूरमध्ये मनसे शिवसेना-भाजपसोबत महायुतीत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत आहे. अंबरनाथमध्ये सुरूवातीची दोन वर्षे शिवसेनेला बाहेरून पाठिंबा आणि नंतर आता काँग्रेस आघाडीसोबत थेट सत्तेत सहभागी आहे. या पाश्र्वभूमीवर मनसेची निश्चित भूमिका कोणती असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनानामक वेगळी राजकीय चुल मांडल्यानंतर गटातटाच्या राजकारणात मनसे नेमके कुठे असणार याबाबत उत्सुकता होती. अंबरनाथ पालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू अवस्थेत मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेना-भाजप-अपक्षांना बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यांच्या बळावरच अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तेत येऊ शकली होती. सेना-मनसे अप्रत्यक्ष युतीचा हा अंबरनाथ फॅक्टर राज्यभर गाजला. पुढे काहीशा फरकाने कल्याण-डोंबिवलीतही तसेच घडले. गेल्या वर्षी झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीतही युती आणि आघाडीने जवळपास समान जागा पटकाविल्यानंतर राज ठाकरे यांनी सुरूवातीला सेनेबरोबर जाण्याची तयारी दाखवली होती. मात्र नाशिकमध्ये शिवसेनेने तो समजुतदारपणा न दाखविल्याने पुढे ठाण्यात सेना-मनसेत फिस्कटले. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी ठाणे पालिकेतील शिवसेनेची सत्ता डळमळीत झाली. आता सोमवारी होणाऱ्या अंबरनाथ पालिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत मनसेची मतेच निर्णायक ठरणार आहेत.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विषय समिती सभापती निवडणुकीत मनसेच्या सहापैकी पाच जणांना सभापतीपदे देऊन काँग्रेस आघाडीने त्यांचा पाठिंबा मिळविला आहे. मात्र त्यामुळे आघाडीतील काही सदस्य नाराज असून अनुपस्थित राहून अथवा मत बाद करून ते आपली नाराजी व्यक्त करतील. परिणामी त्याचा फायदा शिवसेनेला होईल, अशी अटकळ सेना समर्थक बाळगून आहेत. गेल्या काही महिन्यात अडचणीच्या काळात ‘राज'गड मातोश्रीवर मदतीसाठी धाव घेतो, असे दिसून आल्याने शिवसेनेच्या गोटात थोडी आशा आहे. मात्र शनिवारी का़ँग्रेस आघाडीने एक पत्रकार परिषद घेऊन ही शक्यता फेटाळून लावताना आघाडी अभेद्य असल्याचा तसेच मनसेचे सर्व सदस्यही सोबत असल्याचा निर्वाळा दिला. आघाडीचे सर्व सदस्य कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करणार असल्याची ग्वाही शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांनी दिला.