मुख्यमंत्री , आठवलेंकडून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस Print

प्रतिनिधी
मुंबई
शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीमधील एक शिलेदार व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शनिवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरध्वनी करून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहू शकले नाहीत. त्या वेळी दाखवण्यात आलेल्या त्यांच्या चित्रफितीत ते खूप थकल्यासारखे आणि आजारी दिसत होते. त्यामुळे मेळाव्यानंतर गेल्या काही दिवसांत अनेक नेते, नामवंत कलाकरांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या पाश्र्वभूमीवर रामदास आठवले शनिवारी ‘मातोश्री’वर गेले आणि त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुमारे तासभर उद्धव आणि आठवले यांचे बोलणे झाले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच उद्धव यांच्यावरही शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांचीही विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केली.