मध्य आणि हार्बरवर आज मेगाब्लॉक Print

प्रतिनिधी
मुंबई
मध्य रेल्वेवर रविवारी, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री चार तासांचा जम्बो ब्लॉक करण्यात आल्यामुळे रविवारी दिवसभर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक करण्यात आला आहे. या काळात सर्व वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आल्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा थांबणार नाहीत. या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कल्याण आणि डोंबिवली स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यान तसेच वडाळा ते माहीम दरम्यान दोन्ही दिशेने सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० या काळात मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला दरम्यानच्या हार्बर मार्गावरील वाहतूक मेन लाईनच्या जलद मार्गावरून करण्यात येणार आहे. या गाडय़ा चिंचपोकळी आणि करीरोड येथे थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, पशिचम रेल्वेने शनिवार-रविवारच्या मध्यरात्री ११.५५ ते ३.५५ या वेळेत माहीम आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो ब्लॉक केल्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक करण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.