राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून ‘सेन्सॉर’चे उल्लंघन! Print

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळात जुंपली
 संजय बापट
 मुंबई
कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यापूर्र्वी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकार असतानाही राज्य शासनाकडूनच या नियमाचे सर्रास उलंघन केले जात आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागानेही ‘सेन्सॉर’चे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणताही कार्यक्रम करू नये, असा फतवा रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने काढला आहे.
 रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ हे शासनाचे एकमेव आणि घटनात्मक मंडळ असून या मंडळाच्या परवानगीशिवाय रंगभूमिवर कोणताही कार्यक्रम सादर करता येत नाही. राज्यातील सर्व नाटय़संस्था, सांस्कृतिक संस्था नाटक, वाद्यवृंद वा सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळाची परवानगी घेऊनच सादर करतात. मात्र राज्य सरकारच्याच सांस्कृतिक कार्य विभागाकडून या नियमाचे सर्रास उलंघन केले जात आहे. महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक, स्वातंत्र्यदिन वा अन्य महोत्सवांच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांसाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र घेतले जात नाही.
सेन्सॉरबोर्ड हे राज्य सरकारच्या अख्यत्यारित असल्यामुळे सरकारी कार्यक्रमांना त्यांच्या परवानगीची गरज नाही असा दावा सांस्कृतिक कार्य विभागाकडून केला जात आहे. पूर्वी सांस्कृतिक आणि परिवहन हे दोन्ही विभाग गृहविभागाच्या अखत्यारित होते. त्यामुळे केवळ पोलिसांच्या परवानगीने कार्यक्रम करता येतात असा दावा करीत संचालनालयाने सेन्सॉरचे प्रमाणपत्र घेण्यास नकार दिला आहे. मात्र शासकीय असो वा खाजगी, सर्वच संस्थाना रंगभूमीवरील कार्यक्रमासाठी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्यामुळे त्यातून राज्य सरकारला सवलत देता येणार नाही.
शासनासाठी एक आणि नागरिकांसाठी दुसरा नियम अशी भारतीय संविधानात कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाला कार्यक्रम करण्यापूर्वी प्रमाणपत्र घ्यावेच लागले,अशी भूमिका रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने घेतल्यामुळे या दोन्ही संस्थांमधील वाद चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. श्िंादे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, मंडळाच्या नियमातच तशी तरतूद असून कायदा करणाऱ्यांनाही तो लागू होतो, त्यामुळे सांस्कृतिक संचालनालयानेही तो पाळायला हवा. सांस्कृतिक कार्यसंचालक आशुतोष घोरपडे यांच्याशी सातत्याने संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.