कल्याण पालिकेत महापौर दालनातील ‘एसी’दुरूस्तीसाठी घरगुती सिलेंडरचा वापर Print

प्रतिनिधी

कल्याण
गॅस सिलिंडरचा तुटवडा, वाढलेल्या किमती यामुळे सामान्य नागरिक होरपळून निघाला असतानाच कल्याण डोंबिवली पालिका महापौरांच्या दालनाचे नुतनीकरण आणि वातानुकुलीत यंत्रणा सुसज्ज करण्याच्या कामासाठी ठेकेदाराकडून बिनधास्तपणे घरगुती सिलेंडरचा वापर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
हाँगकाँग दौऱ्यावरून परतण्याअगोदर महापौर दालन सुसज्ज आणि वातानुकुलीत करण्याचा विडा पालिका अधिकाऱ्यांनी उचलला आहे. दोन दिवसापूर्वीच महापौर परतल्याने अधिकाऱ्यांची पळापळ झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील ढासळलेली आरोग्य व्यवस्था, पालिका रूग्णालयातील संपलेला औषधसाठा, डेंग्यूचे वाढते रूग्ण, सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा, रखडलेले विकास प्रकल्प आणि पाणी टंचाईचे प्रश्न गंभीर रूप धारण करीत असताना महापौर गुजर यांच्या दालनाच्या नूतनीकरणासाठी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी दोन महिन्यापूर्वी ९ लाख ९४ हजार ८१० रूपयांच्या कामाला मंजुरी दिली आहे. नूतनीकरण आणि सहा टनाच्या दोन वातानुकुलीत यंत्रांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
महापौर दालनासमोरील वातानुकुलीत यंत्रणेचे कॉपर पाईप जोडण्यासाठी कामगारांनी व्यापारी तत्वाच्या सिलेंडरऐवजी घरगुती गॅस सिलेंडरचा केला. ही बाब पालिकेत वाऱ्यासारखी पसरताच माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र रहाळकर, सिध्दार्थ कांबळे यांनी या कामाला हरकत घेतली. याबाबत पालिकेचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यशवंत सोनवणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कनिष्ठ अभियंता जितेंद्र जोशी यांची नेमणूक केली आहे. हे काम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उपअभियंता प्रशांत भागवत यांना या कामाचा चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.