शिवसेना आमदारांच्या कामगिरीने उद्धव अस्वस्थ! Print

विधिमंडळात सातत्याने निष्प्रभ ठरणाऱ्या
विशेष प्रतिनिधी
मुंबई, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

कधी तरी आपले आमदार विद्यार्थी अधिवेशनाच्या वर्गात ‘चमक’ दाखवतील या प्रामाणिक अपेक्षेमधून यंदाही उद्धव ठाकरे गुरुजींनी आमदारांची परीक्षापूर्व तयारी करून घेतली. तशी उद्धव गुरुजी हे गेले काही अधिवेशनांपासूनच ही तयारी करून घेत आहेत. अगदी भगव्या वेष्टनामधून आमदारांसाठी विषयानुसार कात्रणांपासून आवश्यक कागदपत्रे बांधून देण्याचे काम ते इमाने इतबारे करत आले आहेत.

त्यानंतरही विधिमंडळात सेनेच्या आमदारांची कामगिरी फारशी प्रभावी न झाल्यामुळेच नाराज उद्धव गुरुजींनी यंदा आमदारांचा ‘अभ्यास वर्ग’ थोडा आधीच घेतला आहे. किमान या आमदारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल व अधिवेशनातील परीक्षेत ते उत्तीर्ण होतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात ‘अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यावरून कसा हल्ला कराल’ हा मुख्य प्रश्न असल्याचे उद्धव गुरुजींनी जाहीर केले. परीक्षेपूर्वीच पेपरमधील काही महत्त्वाचे प्रश्न त्यांनी आमदार विद्यार्थ्यांना दिले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरु असलेल्या राजकीय आरोपांचाही लाभ त्यांनी करून घ्यावा, अशी उद्धव गुरुजींची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी जैतापूर अणुउर्जा प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी रान उठवले होते. मात्र विधानसभेत जैतापूरच्या मुद्दय़ावरून मंत्री नारायण राणे यांनी उद्धव यांच्यावरच भल्या मोठय़ा सुपारीचा आरोप केला त्यावेळी सेनेचे बहुतेक आमदार गायब झाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही याची गंभीर दखल घेऊन मातोश्रीवर बोलावून सेनेच्या आमदारांची ‘हजेरी’ त्यावेळी घेतली होती. अर्थात त्याचा फारसा उपयोग झाला नाही आणि ठाण्याच्या आमदारांनी आपली वेगळी चूल मांडत विधिमंडळात अभ्यासपूर्ण बोलण्याऐवजी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर चॅनलवाल्यांना बाईट देऊन चमकण्यातच धन्यता मानली होती. सेनेच्या आमदारांमध्ये सध्या ग्रामीण, शहरी त्यातही मुंबईचे आणि ठाण्याचे असे गट बनले असून आपल्याला मागच्या बाकावर उगी गप्प बसून राहावे लागत असल्याचा राग ग्रामीण भागातील आमदारांमध्ये असल्यामुळे ते गप्प बसून राहाणेच पसंत करतात. बबनराव घोलप तर तटस्थ पंचासारखे बसून असतात आणि आपल्याकडे प्रचंड दारुगोळा असूनही बोलू दिले जात नसल्यामुळे ठाण्याचे किल्लेदार एकनाथ शिंदे दाढीवरून हात फिरवत अस्वस्थता व्यक्त करतात. सुभाष देसाई हे शिवसेनेचे गटनेते आहेत की ‘गांधीवादी’ असा प्रश्न सेनेचेच आमदार उपस्थित करताना दिसतात. विधान परिषदेत तर निलम गोऱ्हे आणि दिवाकर रावते यांच्यावरच चर्चेचा रोख असतो. या साऱ्यात भाजपचे एकनाथराव चलाखीने अनेक विषय गुंडाळून नेतात आणि सेनेच्या आमदारांना केवळ पाहात बसण्याशिवाय काही उरत नाही. यंदाच्या अधिवेशनात कृपाशंकर, अजित पवार, सुनिल तटकरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांवर तुटून पडण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अंतिम परीक्षेपूर्वी आणखी एकदा आमदारांचा ‘अभ्यासवर्ग’ घेतला जाईल, असेही त्यांनी सेना भवनात सांगितले.