शिवसेनेचे राहुल गांधींवर टीकास्त्र Print

विशेष प्रतिनिधी
मुंबई
कारगील युध्दाच्या वेळी काँग्रेसने भाजपप्रणित एनडीए सरकारला पाठिंबा दिला होता, पण किरकोळ क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीला ते काँग्रेसला पाठिंबा देत नाहीत, या काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांना कारगील युध्द आणि रिटेल क्षेत्रातील परकीय गुंतवणूक यातील फरक समजत नसेल, तर त्यांना राजकारणात राहण्याचा कोणताही हक्क नसल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत रविवारी झालेल्या मेळाव्यात हे वक्तव्य केले होते. ‘राहुल गांधी हे राजकारणात केवळ बच्चेच नसून कच्चेही आहेत,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. कारगीलचे युध्द पाकिस्तानने भारतावर लादले होते. त्यावेळी आपसातील मतभेद विसरून सर्वानी शत्रूला नेस्तनाबूद करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती. तेव्हा काँग्रेस सत्तेवर असती, तर एनडीएनेही पाठिंबाच दिला असता. वॉलमार्टसारखे राहुल गांधींचे मित्र त्यांच्या फायद्यासाठी भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना एनडीएचा विरोध कायमच राहील, असे राऊत यांनी सांगितले.