रहिवाशांनी पकडले चार चोर Print

प्रतिनिधी
मुंबई
वडाळा पश्चिमेच्या कच्छी लोहाणा चाळीत शनिवारी रात्री चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार चोरांना सतर्क रहिवाशांनी पकडले आहे. मात्र चोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एक माहिला किरकोळ जखमी झाली आहे.
कच्छी लोहाणा चाळीतील दुसऱ्या मजल्यावर जयेश ठक्कर यांचे घर आहे. ते शनिवारी बाहेर गेले होते. रात्री नऊच्या सुमारास चार चोरांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या उमा गणात्रा (६१) यांना ठक्कर यांच्या घरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा संशय आला. शेजारी राहणाऱ्या कृपा ठक्कर (२८) यांना सोबत घेऊन त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या. तेव्हा चार चोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करीत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या दोघींनी आरडाओरड केल्यामुळे इमारतीमधील इतर रहिवासी धावत आले. जय सचदेव, नीमेश मेहता आदी रहिवाशांनी त्या चौघांना पकडून ठेवले. माटुंगा पोलिसांनी या चोरांना अटक केली.