‘एमएचटी-सीईटी’ आता ‘एमटी-सीईटी’ म्हणून ओळखली जाणार Print

प्रतिनिधी
मुंबई
गेली अनेक वर्षे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी परावलीचा शब्द बनलेली ‘एमएचटी-सीईटी’ ही यापुढे ‘एमटी-साईटी’ म्हणून ओळखली जाणार आहे. राज्य सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेतून २०१३ सालापासून आरोग्य विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम वगळले जाणार असल्याने तिचे नाव बदलण्यात आले आहे.
एमबीबीएस आणि बीडीएस या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय स्तरावर ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा होणार आहे. २०१३ मध्ये होणाऱ्या या परीक्षेत महाराष्ट्रही सहभागी होणार आहे. ‘एमएचटी-सीईटी’त आरोग्य विज्ञान (हेल्थ सायन्सेस) अभ्यासक्रमांसाठी ‘एच’ हे लघुरूप अक्षर वापरले जात होते. मात्र, एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांचा समावेश २०१३ पासून ‘एमएचटी-सीईटी’त होणार नसल्याने ‘एच’ हे अक्षरही वगळले जाणार आहे. त्यामुळे, नवी एमटी-सीईटी केवळ अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांपुरती मर्यादित असेल. ‘उच्च व तंत्रशिक्षण विभागा’चे तंत्रशिक्षण संचालनालय २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांसाठी मे २०१३ ला ‘एमटी-सीईटी’ घेईल. या आधी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण संचालनालय पार पाडत होते.
अर्थात एमटी-सीईटीचे अस्तित्त्वही मे २०१३ पुरतेच मर्यादित असेल. त्यानंतर म्हणजे २०१४ सालापासून राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या ‘जेईई’ या परीक्षेचे गुण बारावीच्या गुणांसोबत स्वीकारण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे, एमटी-सीईटी ही केवळ एक वर्षांपुरतीच घेण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संचालनालयावर असेल. प्रवेश परीक्षेच्या नावात जरी बदल झाला असला तरी त्याचे स्वरूप आधीप्रमाणेच असेल. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या ‘पीसीएमबी’ विषयगटांचा समावेश या एमटी-सीईटीतही असेल. औषधनिर्माण शास्त्राचा निर्णय अधांतरीच
मे २०१३ मध्ये होणाऱ्या ‘एमटी-सीईटी’तून अभियांत्रिकीबरोबरच औषधनिर्माण शास्त्र या विद्याशाखेचेही प्रवेश केले जाणार आहेत. मात्र, त्यानंतर २०१४ पासून अभियांत्रिकीचे प्रवेश जेईईमधून होणार हे जरी स्पष्ट असले तरी औषधनिर्माण शास्त्राचे प्रवेश कसे होणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयातील सूत्रांनुसार औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठी संचालनालय स्वतंत्रपणे सीईटी घेईल. मात्र, राज्य सरकारने या धोरणात्मक निर्णयावर शिक्कामोर्तब करेपर्यंत तरी हा गोंधळ कायम राहणार आहे.