हकीम सूत्रांनुसार यापुढे नवी भाडेवाढ १ मे रोजीच! Print

प्रतिनिधी
मुंबई
सीएनजी इंधनात बुधवारी ८५ पैशांची वाढ झाल्यावर टॅक्सीच्या भाडय़ात आणखी किमान एक रुपयांची वाढ करण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली असली तरी रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करणाऱ्या डॉ. हकीम समितीने केलेल्या शिफारशींनुसार भाडेवाढ केवळ १ मे रोजीच होणार आहे. बुधवारी झालेल्या भाडेवाढीचा परिणाम रिक्षा-टॅक्सीच्या भाडय़ावर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रात चालणाऱ्या रिक्षा-टॅक्सी या सीएनजी इंधनावर चालत आहेत. बुधवारी सीएनजीचे शहरातील दर ८५ पैशांनी वाढल्यावर टॅक्सी संघटनेचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली. मात्र डॉ. हकीम यांनी भाडेवाढीबाबत आपल्या शिफारस अहवालात स्पष्टपणे अशा छोटय़ा वाढीमुळे भाडेवाढ करू नये असे म्हटले आहे. त्यांच्या अहवालानुसार, ‘मागील भाडे सुधारण्याच्या वेळेस निश्चित केलेल्या मूळ भाडय़ात जर २० टक्क्यापेक्षा जास्त भाडेवाढ देय होत असेल आणि वार्षिक भाडे सुधारण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असेल तरच अशा असामान्य परिस्थितीत एक वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता भाडे सुधारणा करावी.
ही भाडेवाढ लगेच न करता पुढील महिन्याच्या १ तारखेपासून करावी’ असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आता इंधनाचे दर वाढले तरी भाडेवाढ होणार नाही, हे प्रवाशांनी ध्यानात ठेवून कोणी जादा भाडे मागत असेल तर त्वरित परिवहन विभागाकडे किंवा युनियनकडे तक्रार करावी, असे आवाहन परिवहन विभाग आणि टॅक्सी-रिक्षा युनियननी केले आहे.