अधिसूचित आजारांच्या यादीत डेंग्यूचा समावेश करा Print

हेल्प मुंबई फाऊंडेशन संघटनेची मागणी
प्रतिनिधी
मुंबई
मुंबईत पसरत असलेल्या डेंग्यूचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्याची व त्यासंबंधीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्याची मागणी ‘हेल्प मुंबई फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संघटनेतर्फे जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात ही याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
फाऊंडेशनच्या वतीने वरूणा खन्ना यांनी ही याचिका केली आहे. चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचे निधन डेंग्यूमुळे झाल्याचे निष्पन्न होताच मोठीच खळबळ उडाली. डेंग्यूने मुंबईत अक्षरश: दहशत निर्माण केली आहे. पालिकेनेही घाईघाईने डेंग्यूग्रस्त रुग्णांचा तपशील जमा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ७२५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. परंतु पालिकेने जाहीर केलेली यादी केवळ पालिका रुग्णालयापुरती मर्यादित आहे. खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांचा त्यात समावेश नाही. त्याची आकडेवारी पालिकेकडे नाही. त्यामुळे मुंबईत डेंग्यूचे नेमके किती रुग्ण आहेत याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. डेंग्यूबाबत पालिकेतर्फे म्हणावी तशी जनजागृती केली जात नाही. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पाचकलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
डेंग्यूचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत नसल्यानेच त्याची नेमकी आकडेवारी समोर येत नसल्याचा दावा याचिकादारांनी केला आहे. तसे झाले तरच औषधविक्रेत्यांपासून खासगी रुग्णालये, डॉक्टर आदी सगळ्यांना डेंग्यूची आकडेवारी व रुग्णांची तपशीलवार माहिती पालिका व सरकारला देणे बंधनकारक ठरू शकेल, असेही याचिकेत नमूद केले आहे.