दादरच्या बालेकिल्ल्यासाठी सेना-मनसेकडून कामाचा सपाटा! Print

विशेष प्रतिनिधी
मुंबई
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दादर मतदारसंघ मनसेने काबीज केल्यापासून शिवसेनेने दादरमध्ये अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनीही दादरच्या पराभवाचे शल्य बोलून दाखवले होते. या पाश्र्वभूमीवर मनसेनेही दादरचा मानबिंदू असलेल्या चौपाटीच्या सुशोभीकरणाचे काम सुरु करून सेनेकडून जिंकलेला बालेकिल्ला राखण्यासाठी आपणही सज्ज असल्याचे दाखवून दिले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दादर चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार नितीन सरदेसाई यांनी तीन वर्षे पाठपुरावा केल्यामुळे मेरी टाईन बोर्डाने चौपाटी संवर्धन व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले असून  त्यास मुंबई महापालिकेनेही हातभार लावावा अशी अपेक्षा सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने शिवाजी पार्कचे सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची म्युरल्स लावली होती. तर तरण तलाव, संयुक्त महाराष्ट्राचे दालन असे उपक्रम राबविले होते. त्यानंतरही दादरमधील नगरसेवकांच्या सातही जागा मनसेने जागा जिंकल्या होत्या. दसरा मेळाव्यात मनसेने दादरमध्ये धुळ चारल्याची खंत बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती.