उद्धव ठाकरे यांच्यावरील एन्जिओप्लास्टी यशस्वी Print

विशेष प्रतिनिधी

मुंबई, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृदयावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात रविवारी दुसऱ्यांदा एन्जिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून तब्येत उत्तम असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे जुलैमध्ये त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे डॉ. सॅम्युअल मॅथ्यू यांच्या नेतृत्वाखाली अँजिओग्राफीनंतर त्यांच्या हृदयावर अँजिओप्लास्टी  करण्यात आली होती. त्या वेळी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी आठ स्टेंट डॉक्टरांनी बसवले होते. त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी करावी लागेल, असे त्या वेळी डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार चार नोव्हेंबर ही तारीख पूर्वीच डॉक्टरांनी निश्चित केली होती. उद्धव ठाकरे रविवारी सकाळी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य व तेजस हेही होते. चुलतबंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही रुग्णालयात उपस्थित होते. उद्धव यांना दोन-तीन दिवस रुग्णालयात ठेवले जाण्याची शक्यता आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.    

बाळासाहेबांची प्रकृती जैसे थे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसली तरी ती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रविवारी ठाकरे यांची वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही त्या वेळी मातोश्रीवर पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनाप्रमुखांची तब्येत गंभीर होऊ लागल्याने छगन भुजबळांसह अनेक नेत्यांनीही त्यांची भेट घेतली आहे. शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे दोघेही आजारी असल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.