चोरटय़ाचा स्पॅनिश तरुणीवर बलात्कार Print

प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे येथे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने घरातील एका परदेशी तरुणीवर बलात्कार केला. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. आरोपीस शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत.
वांद्रे पश्चिमेच्या पेरी क्रॉस या उच्चभ्रू वसाहतीत ही तरुणी पाच सहा महिन्यांपासून राहात होती. तिच्यासोबत रूम पार्टनर म्हणून तिची मैत्रीण राहात होती. या दोघीही स्पॅनिश आहेत. रविवारी रूम पार्टनर मैत्रीण बाहेर गेल्याने फिर्यादी तरुणी फ्लॅटमध्ये एकटीच होती. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास एक चोर तिसऱ्या मजल्यावरील तिच्या फ्लॅटमध्ये बाल्कनीतून आत शिरला. दुर्देवाने तिच्या फ्लॅटच्या खिडक्यांना लोखंडी जाळी नव्हती आणि खिडकीही उघडी होती. चोराला ती एकटी असल्याचे समजले आणि त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. सुरवातीला तिने आपली सुटका करवून घेत शेजाऱ्यांचे दार ठोठावले. परंतु शेजारीही घरात नव्हते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. ही तरुणी खालच्या मजल्यावर पळून जाण्यात यशस्वी ठरली असती तर कदाचित ही घटना घडली नसली, असेही ते म्हणाले. चाकूच्या धाकाने या चोराने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने स्वत:ला वाचविण्यासाठी बाथरूममध्ये कोंडून घेतले होते. तिने बचावासाठी धावा केल्यावर चौथ्या मजल्यावरील शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी मग या तरुणीची सुटका केली. चोराने तिचे दोन मोबाईल, मूव्ही कॅमेरा आणि रोख रक्कम आणि डॉलर तसेच काही किरकोळ सामान लंपास केले.
या चोराच्या तपासासाठी पोलिसांनी आठ पथके स्थापन केल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.  या तरुणीवर बलात्कार क रणारा सराईत चोर असल्याचे ते म्हणाले.