कुपोषणमुक्ती अभियान शहरांतही राबविणार Print

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील ग्रामीण भागात जाणीवपूर्वक प्रयत्न करुन लहान मुले व मातांमधील कुपोषण कमी करण्यास यश मिळाल्यानंतर आता शहरी भागातही कुपोषणमुक्तीचे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ७ एप्रिल २०१३ पर्यंत ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील ० ते ३ वर्षे वयोगटातील मुलांचे व मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान राबिण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यात २००५-०६ पासून कुपोषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबिण्यात येत आहेत. २०११-१२ पासून राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान सुरु करण्यात आले. या सर्व योजना ग्रामीण भागात राबविल्या जात असून  सुरुवातीला ३ ते ६ वयोगटातील मुलांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यानंतर त्यात सुधारणा करुन ६ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्य सुधारणेवर भर देण्यात आला. परंतु ३ वर्षांपर्यंतचा वयोगट सर्वाधिक संवेदनशील असतो. या गटातील मुलांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्यानुसार नवीन योजना सुरु करण्यात येत आहे. युनिसेफ व इतर संस्थांच्या सूचनांनुसार मातेला दिवस गेल्यापासून बाळंतपण ते २४ महिन्यांचे मूल होईपर्यंत माता व त्या मुलाचे आरोग्य, पोषण आहार यावर खास लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात गेली अनेक वर्षे कुपोषण निर्मूलनासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात समाधानकारक प्रगती दिसून येत आहे. आता आपणास कुपोषणमुक्तीकडून पोषणाकडे जायचे आहे, त्यासाठीच कुपोषण मुक्त अभियानाचे नाव आता आरोग्य व पोषण अभियान असे करण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही कुपोषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्याचा विचार करुन या अभियानाची व्याप्ती ग्रामीणभागापासूनन शहरी भागापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी केंद्रीय अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री निनॉंग एरींग उपस्थित होते.