मालाड येथे वृद्धेची हत्या Print

प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतल्या वरिष्ठ नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरूच असून मालाड येथे आणखी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. निर्मला व्होरा (७८) ही वृद्धा आपल्या घरात मृतावस्थेत आढळली. त्यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी व्होरा यांच्या ज्युस सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. निर्मला व्होरा यांचे मालाडच्या इनऑर्बिट मॉल येथे ज्युसचे दुकान आहे. मालाड पश्चिमेच्या एसव्ही रोडवरील मोमीन चाळीत त्या मुलगी प्रेरणा व्होरा (६२) यांच्यासह राहात होत्या. प्रेरणा दिवसभर दुकानात जाऊन रात्री घरी परत येतात. रविवारी रात्री साडेअकरा वाजता त्या घरी आल्यावर त्यांना निर्मला व्होरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या.