पोहरे प्रकरणात राजकीय नेत्यांची चुप्पी Print

सचिन देशपांडे, अकोला
प्रकाश पोहरे यांच्या गोंडखैरी येथील प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांनी चुप्पी साधली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात ब्र सुध्दा उचारला नाही. भारिप-बमसंचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील सांत्वन भेट वगळता त्यांनी अकोल्यात चुप्पी साधली. पिरिपाइंच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर धरणे आंदोलन केले. पण, सर्वच राजकीय पक्षांनी मैत्री, नातेसंबंध व आर्थिक हितसंबंध लक्षात घेता वर्तमानपत्राच्या मालकाशी उगाच वैर नको, अशी भूमिका घेत मौन बाळगले.
नानासाहेब वैराळे यांनी अकोल्यात स्थापन केलेल्या ‘देशोन्नती’चे साम्राज्य प्रकाश पोहरे यांनी स्वबळावर विस्तारले. एकाधिकार असताना कापूस आंदोलन असो की, गेल्या काही वर्षांत विजेचे आंदोलन यात प्रकाश पोहरे यांनी समग्र शेतकरी विकास आघाडीच्या झेंडय़ाखाली वादळी लढा दिला. नागपूर जिल्ह्य़ातील गोंडखैरी येथे १३ ऑक्टोबर रोजी पोहरे यांच्या इशाऱ्यावरुन हरिकृष्ण द्विवेदी याने झाडलेल्या गोळीत राजेंद्र दुपारे यांचा मृत्यू झाला. या घटनेने वृत्तपत्र क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली. असे असताना या सर्व प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना, भारिप बमसं यांची अकोल्यात चुप्पी का असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रकाश पोहरे यांच्यासोबत राजकीय नेत्यांचा घरोबा, नातेसंबंध तर आहेतच शिवाय काही राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत.