पाण्याची गळती नव्हे, टँकर लॉबीची चोरी! Print

‘ओआरएफ’च्या अहवालातील दावा
प्रतिनिधी, मुंबई
खासगी टँकरचालक आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांच्या युतीमुळे गळतीत दाखविले जाणाऱ्या सुमारे ७०० दशलक्ष लीटर पाण्यापैकी तब्बल २० टक्के पाणी खासगी टँकर मालकांच्या घशात जाते आहे, असा आरोप ‘ऑब्जव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन’ने (ओरआरएफ) मुंबईच्या पाणी समस्येवर प्रकाशित केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.
माजी पत्रकार आणि ओआरएफचे संशोधक धवल देसाई यांनी हा अहवाल तयार केला आहे. ‘पुणे शहराला एक दिवस पुरेल एवढे, ७०० एमएलडी पाणी मुंबईत गळतीत वाया जाते. पाण्याची नासाडी, गळती, चोरी थांबविली नाही, भ्रष्टाचाराने पोखरलेली टँकर व्यवस्था बंद केली नाही, पाऊस, नैसर्गिक स्त्रोत्रांद्वारे उपलब्ध होणारे पाणी, पाण्याचा पुनर्वापर आदी मार्ग अनुसरले गेले नाही तर मुंबईतील पाण्याची समस्या भविष्यात आणखी कठीण होईल,’ असा इशारा त्यांनी आपल्या अभ्यासाद्वारे दिला आहे.
‘पाणी व्यवस्थापनासाठी पालिका अनेक योजना आखते आहे. मात्र, सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया आणि पाणी पुनर्वावर यांसारख्या दीर्घकालीन योजनांच्या दृष्टीने प्रगती नगण्य आहे. पाण्याचे चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापन होत असल्याने मुंबईतील बऱ्याच भागात पाण्याची समस्या भेडसावते आहे. पाण्याचे योग्य नियोजन केले जावे यासाठी मुंबईकरांनी जनमताचा दबाव आणावा,’ असे आवाहन ओआरएफचे सुधींद्र कुलकर्णी यांनी केला.
‘बाहेरून येणाऱ्या लोढय़ांना आवर घातला जात नाही तोपर्यंत पाणीच काय तर कचरा, मल:निस्सारणासारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणे शक्य नाही,’ असे मत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे संदीप देशपांडे यांनी या अहवालावरील चर्चेत सहभागी होताना मांडले.     
अहवालातील महत्त्वाच्या सूचना
*मुंबईकरांच्या नियमित पाण्याच्या वापराचा आलेख मांडणारा       नकाशा बनणे आवश्यक
*जमिनीखालून जाणाऱ्या जलवाहिन्यांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे डिजिटलाईज्ड नकाशा तयार करणे
*महत्त्वाच्या जोडणीवर जलमापक (मीटर) बसविणे
*पाणीगळती आणि जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण रोखणे
*पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा विकास करणे
*वापर झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा दुय्यम कामांसाठी वापर करणे
*पर्जन्य जलसंधारण विभाग सक्षम करणे