बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा Print

पालिका देणार १६०० कोटी रुपयांचे कर्ज
प्रतिनिधी , मुंबई

बेस्ट उपक्रमाला पालिकेकडून १६०० कोटी रुपयांचे कर्ज दहा टक्के व्याजदराने देण्याचा प्रस्ताव सोमवारी पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत बोनसबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्जाच्या प्रस्तावाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. गेल्या महिन्यात झालेल्या सभेच्या वेळी बहुमताचा अभाव असल्याने सत्ताधारी पक्षाने बेस्ट कर्जाचा प्रस्ताव पुढे ढकलला होता. त्यावर सोमवारी विशेष सभा बोलावण्यात आली होती.
पालिकेच्या सभागृहातील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी सोमवारच्या विशेष सभेत बेस्टला बिनव्याजी कर्ज देण्याची उपसूचना मांडला तर भाजपाचे गटनेते दिलीप पटेल यांनी १० टक्के व्याजाने बेस्ट उपक्रमाला कर्ज द्यावे अशी उपसूचना केली. त्यामुळे या प्रस्तावांवर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये पालिकेच्या सभागृहात बेस्ट उपक्रमाला दहा टक्के व्याजाने १६०० कोटी रुपये इतके कर्ज देण्याच्या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली. आता मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाबाबत चर्चा केली जाणार असली तरी हा प्रस्ताव मंजूर झाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळेयांनी बेस्ट उपक्रमाला ११ टक्के व्याजाने कर्ज देण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपाच्या पटेल यांनी मांडलेली १० टक्के व्याजदराने कर्ज देण्याची उपसूचना मंजूर करण्यात आल्याने सभागृहात भाजपाने शिवसेनेवर मात केल्याचे चित्र निर्माण झाले.