बंग यांची ‘बकाल’ मानसिकता! टीका झोंबलेल्या राष्ट्रवादीचा हल्ला Print

खास प्रतिनिधी, मुंबई
मद्यक्रांतीचे राजकीय सत्तापीठ हे बारामतीमध्ये असल्याची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच झोंबली आहे. डॉ. बंग यांची उठबस एका राजकीय पक्षाबरोबर असून त्यांच्या वक्तव्यातून त्यांचा ‘मानसिक बकालपणा’ दिसून येतो, अशा शब्दांत राष्ट्रवादीने डॉ. बंग यांना आज लक्ष्य केले.
बारामती हे मद्यक्रांतीचे सत्तापीठ आहे, अशी टीका डॉ. बंग करतात, पण बारामतीने नेहमीच साबरमतीचा आदर्श ठेवला. डॉ. बंग हे नागपूरच्या तालावर (रा. स्व. संघ) चालत असतात. अलीकडेच त्यांच्या संस्थेत भाजपशासीत राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक झाली. डॉ. बंग हे कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.