हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल Print

खास प्रतिनिधी, मुंबई

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे जवळपास नक्की झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला दुजोरा दिला. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशीही चर्चा करण्यात येणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीस ११ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोटय़ातील तीन जागा रिक्त आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादीचीही एक जागा रिकामी झाली आहे. काँग्रेसच्या कोटय़ातील रिक्त जागा भराव्यात अशी मागणी पक्षातून सातत्याने होत आहे. त्याची तयारी आता मुख्यमंत्र्यांनी केली आहे. परंतु त्यांना केवळ मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही तर, फेरबदलही करायचा आहे, असे सांगण्यात येते. त्यामुळे काही मंत्र्यांमध्येही अस्वस्थता आहे.     
काँग्रेस व राष्ट्रवादीत पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत, याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले असता, त्यावर काहीही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.