सानुग्रह अनुदानासाठी बेस्ट कामगारांचे गुरुवारी आंदोलन Print

प्रतिनिधी
मुंबई
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान मंजूर करावे, यामागणीसाठी येत्या गुरुवारी वडाळा आगार येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमातील कॅज्युअल कामगार, रोजंदारी कामगार, स्थायी कामगार व अधिकाऱ्यांना २० टक्के दराने सानुग्रह अनुदानाची रक्कम मंजूर व्हावी म्हणून आग्रह धरण्यात आला होता. सोमवारी बेस्टला कर्ज देण्याचा प्रस्ताव पालिकेत मंजूर झाल्यानंतर मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सानुग्रह अनुदानाची रक्कम मंजूर होईल अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, यात दिरंगाई होत असल्यामुळे गुरुवार, ८ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता बेस्टच्या वडाळा आगारसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार क्रांती संघ, मुंबई इलेक्ट्रिक ऑफिसर्स आसोसिएशनने जाहीर केले आहे.
बेस्ट समितीची तातडीने सभा बोलावून दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम मंजूर करणे, कराराची थकबाकी रक्कम त्वरित देणे, अधिकाऱ्यांचा एप्रिल २००६ पासून प्रलंबित असलेला वेतन करार त्वरित करणे या मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन केले जाणार
आहे.