वैद्यकीय ‘नीट’ नाहीच? Print

गोंधळात गोंधळ
प्रतिनिधी, मुंबई
एमबीबीएस आणि बीडीएस या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या ‘नीट’ या सामाईक प्रवेश परीक्षेच्या अंमलबजावणीतील गोंधळाचे कारण देत राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या संघटनेने २०१३ या वर्षांसाठीही आपली ‘असो-सीईटी’ घेण्याचे जाहीर करून आपला सवतसुभा मांडला आहे. त्यातच महाराष्ट्राबरोबर वेगवेगळ्या राज्यांतील उच्च न्यायालयांनी ‘नीट’ला स्थगिती दिल्याने वैद्यकीयसाठी ‘एक राष्ट्र, एक सीईटी’ २०१३ मध्येही साध्य होणे कठीण आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी २०१३ची ‘एमएचटी-सीईटी’ होणार नाही हे जाहीर करून राज्य सरकारने विद्यार्थ्यांना नीटच्या अभ्यासाला लागावे म्हणून सांगितले आहे. पण, नीटचे अस्तित्व न्यायालयीन लढय़ात अडकल्याने मुळात ती होईल की नाही हेच स्पष्ट नाही. अर्धे शैक्षणिक वर्ष सरत आले तरी २०१३च्या वैद्यकीय प्रवेशांबाबत असलेल्या या गोंधळामुळे विद्यार्थी मात्र नाहक भरडले जाते आहेत.
‘असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ अनएडेड प्रायव्हेट मेडिकल अ‍ॅण्ड डेंटल कॉलेजेस’ (एएमयूपीएमडीसी) या खासगी महाविद्यालयांच्या संघटनेतर्फे एमबीबीएस आणि बीडीएससाठी ‘असो-सीईटी’ घेतली जाते. केंद्राने २०१३ पासून होणाऱ्या ‘नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या सामाईक प्रवेश चाचणी परीक्षेत देशभरातील खासगी वैद्यकीय संस्थांना सहभागी होणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे, एमएचटी-सीईटीबरोबरच या वर्षीपासून असो-सीईटीही रद्द होणे अपेक्षित होते. मात्र, २०१३च्या नीट परीक्षेच्या परिपत्रकाला कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यांतील उच्च न्यायालयांनी स्थगिती दिल्याचे कारण देत ‘एमएमयूपीएमडीसी’ने आपली वेगळी चूल मांडली आहे.
‘नीटच्या अंमलबजावणीबाबत गोंधळ तर आहेच. शिवाय नीटबाबत निर्णय घेताना ‘ऑल इंडिया मेडिकल कॉलेजेस असोसिएशन’ या राष्ट्रीय संघटनेला विश्वासात घेतले गेले नाही,’ असे सांगत ‘एएमयूपीएमडीसी’चे अध्यक्ष डॉ. कमलकिशोर कदम यांनी स्वतंत्र सीईटीचे समर्थन केले. एएमयूपीएमडीसीने जाहीर केलेल्या तारखांनुसार पीजी-नीट (पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची) आणि यूजी-नीट (पदवी अभ्यासक्रमांसाठीची) अनुक्रमे ६ जानेवारी आणि २६ मे रोजी होणार आहे. त्यापैकी पीजी-नीटसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेलाही सुरूवात करण्यात आली आहे.
केंद्रीय व राज्य स्तरावर द्याव्या लागणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचा ताण कमी करणे आणि विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावर एकच प्रवेश परीक्षा देऊन वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेता यावा हे ‘नीट’च्या आयोजनामागील प्रयोजन आहे. मात्र, अखिल भारतीय स्तरावरील कोटय़ाचे प्रवेश कसे करायचे याबाबत असलेला गोंधळ, अभ्यासक्रम ‘अपडेट’ नसणे आदी कारणांमुळे विविध राज्य सरकारांचा नीटला विरोध आहे. राज्यांबरोबरच काही ठिकाणी विद्यार्थी, संस्थाचालक यांनीही नीटला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.     

मंत्री मतदारसंघात दंग
या गोंधळात वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित मात्र गेले महिनाभर आपल्या नंदूरबार मतदारसंघातच आहेत. ते सेलफोन वापरत नाहीत. त्यामुळे, त्यांच्याशी संपर्क होत नाही. या खात्याचे सचिव इक्बालसिंग चहल हे नर्सिग संस्थांच्या न्यायालयीन लढय़ानेच बेजार आहेत.