युवकाच्या मृत्यूप्रकरणी दोन पोलिसांवर खुनाचा गुन्हा Print

प्रतिनिधी, मुंबई
विद्याविहार येथे रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या मारहाणीत कल्याण साळवे (वय १७) या युवकाच्या ओढवलेल्या मृत्यूवरून सोमवारी संध्याकाळी दोन हवालदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. परंतु परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्यानंतर हा गुन्हा दाखल केला गेला. रविवारी विद्याविहार येथील नटराज बारसमोर रात्री साडेअकराच्या सुमारास कल्याण हा बाळकृष्ण साळवे आणि मंजू यादव यांच्यासह पत्ते खेळत आणि गप्पा मारत बसला होता. टिळकनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल तडवी आणि लाड गस्तीवर होते. पोलिसांनी त्यांना हटकले. या पोलिसांनी कल्याणला काठीने मारले. त्यात त्याच्या डोक्यावर घाव बसून तो जागीच कोसळताच दोघे पोलीस पळून गेले. कल्याणला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले पण त्याला मृत घोषित केले गेले.
पोलिसांनी हटकल्यावर धावताना पडून कल्याणचा मृत्यू झाला, अशी नोंद प्रथम पोलिसांनी केली होती. पण हे समजताच परिसरात संतापाची लाट उसळल्याने कल्याण राहत असलेल्या विद्याविहारच्या आंबेडकर नगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी दोन्ही पोलिसांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत मोर्चा काढला. अखेर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मी गौतम यांनी दिली. दरम्यान, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.