एस. टी. कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा Print

नव्या वेतन कराराबाबत असंतोष
खास प्रतिनिधी
ठाणे
इतर शासकीय आस्थापनांच्या तुलनेत अतिशय कमी वेतन असणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या हाती नव्या करारानेही फारसे भरीव काही पडणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी दिवाळीनंतर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसने १ नोव्हेंबर रोजी परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना एका पत्राद्वारे संपाबाबत सूचित केले आहे. नव्या करारान्वये एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन अवघे आठ टक्क्य़ांनी वाढणार आहे. मात्र एस. टी. प्रशासन आणि मान्यताप्राप्त कामगार संघटनेने त्यास मान्यता दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. मान्यताप्राप्त कामगार संघटनेत सध्या अवघे ३३ हजार ६५३ सदस्य आहेत. एस. टी.च्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ते अवघे ३० टक्के आहेत. दरवर्षी एस. टी. महामंडळ शासनास कोटय़वधी रुपयांचा टोल भरते. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक १७.५० टक्के प्रवासी कर आकारला जातो. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तो खूप जास्त आहे. टोल माफ करून प्रवासी कर कमी केला तर कर्मचाऱ्यांना चांगले वेतन तसेच प्रवाशांना चांगल्या सुविधा देता येणे शक्य असले तरी त्याकडे दुर्लक्ष होत आहे.    
असंतोषाची कारणे
* नव्या कराराने वेतन अवघे आठ टक्क्य़ांनी वाढणार
* ३० टक्के कर्मचारी सदस्य असलेल्या मान्यताप्राप्त संघटनेस हाताशी धरून अन्य कर्मचाऱ्यांवर अन्याय